नवरात्रीच्या नऊ रूपांतून घेऊया आर्थिक शिस्तीची प्रेरणा!

JSB Financial Blog    12-Oct-2026
| 0



Navratri-2026
 
नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र तयारी सुरु होती. बाजारपेठा सजावटीच्या, घटाचे सामान, रंगीबेरंगी फुले आणि माळांच्या सुगंधांनी सजल्या होत्या. घरातही देवीच्या पुजनाची लगबग, साफसफाई, उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आणि आनंद, उत्साहाचे वातावरण होते.
 
 
आजीबाई वाती वळत बसल्या होत्या. तुळजा कॉलेजमधून घरी आली, आईची लगबग पाहून तीने आजीला विचारले,
“काय गं आजी, दरवर्षी आपण परंपरा म्हणून देवीची आराधना करतो, यातील प्रत्येकवेळेचे नाविन्य काय आहे? ”
आजी म्हणाली, “अगं तुळजा, आपल्या परंपरा प्रत्येक युगात नवीन उर्जा देण्यासाठी, सर्वांना उमेदीने जागृत करण्यासाठी, जे वाईट झालं ते सोडून देऊन, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात. आता मी तुला देवीच्या विविध रुपांची माहिती सांगते. आदिशक्ती आपल्या सगळ्यांना अतिशय समर्पक मार्गदर्शन करते.”
 
 
तुळजा म्हणाली, “So amazing…सांग ना, मला ऐकायला आवडेल देवीच्या विविध रुपांची आणि गुणांची माहिती. कॉमर्स आणि बँकिंग या माझ्या विषयाशी संबंधित बोलूया का आपण...”
 
 
तेव्हा आजी सांगते -
 
 
नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीची उपासना, सकारात्मक ऊर्जेचा उत्सव आणि जीवनाला नवी दिशा देण्याचा काळ. देवीच्या नऊ रूपांमधून आपल्याला धैर्य, संयम, शिस्त, निर्णयक्षमता आणि समृद्धीचे विविध पैलू शिकायला मिळतात. हीच मूल्ये आपल्या आर्थिक जीवनात आणि बँकिंगच्या सवयींमध्ये रुजवली, तर आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित आणि सक्षम होऊ शकते.
 
 
१. शैलपुत्री – आर्थिक स्थैर्याचा पाया
 
 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजले जाणारे देवीचे रूप म्हणजे शैलपुत्री. पर्वतासारखी स्थिरता आणि दृढता हे या रूपाचे प्रतीक मानले जाते. आर्थिक जीवनातही स्थैर्याला महत्त्व आहे. नियमित बचत, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणि उत्पन्नातील काही भाग सातत्याने बाजूला ठेवण्याची सवय ही आर्थिक स्थैर्याची पहिली पायरी आहे. बचत खात्यात नियमित बचत करण्यापासून या प्रवासाची सुरुवात करता येते.
 
 
२. ब्रह्मचारिणी – संयम आणि सातत्याची शिकवण
 
 
ब्रह्मचारिणी देवीचे रूप संयम, तपश्चर्या आणि ध्येयासाठी सातत्याचे प्रतीक आहे. आर्थिक नियोजनातही हीच शिस्त आवश्यक आहे. बचत करण्याचा निर्णय घेणे सोपे असते; मात्र तो दर महिन्याला सातत्याने अमलात आणणे अधिक महत्त्वाचे असते. आवेगाने होणारा खर्च टाळून ठरावीक आर्थिक उद्दिष्टांसाठी नियोजन करणे ही चांगली आर्थिक सवय आहे.
 
 
३. चंद्रघंटा – सतर्कतेची प्रेरणा
 
 
चंद्रघंटा देवीचे रूप धैर्य आणि सजगतेशी जोडले जाते. डिजिटल बँकिंगच्या युगात आर्थिक व्यवहार करताना हीच सतर्कता आवश्यक आहे. OTP, PIN, CVV, पासवर्ड किंवा बँकिंगची गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद ॲप डाउनलोड करणे किंवा अपरिचित व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे पाठवणे टाळावे. सुरक्षित व्यवहार ही प्रत्येक ग्राहकाची जबाबदारी आहे.
 
 
४. कूष्मांडा – नियोजनातून समृद्धीकडे
 
 
कूष्मांडा देवीला सृजन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आर्थिक समृद्धीसाठी केवळ बचत पुरेशी नाही; योग्य आर्थिक नियोजन आणि गरजेनुसार गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. आपल्या उत्पन्नाचा, भविष्यातील गरजांचा आणि आर्थिक उद्दिष्टांचा विचार करून योग्य बचत व गुंतवणुकीचे पर्याय निवडणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना जोखीम, कालावधी आणि परतावा यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
 
 
५. स्कंदमाता – कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेची जाणीव
 
 
स्कंदमाता हे मातृत्व आणि कुटुंबाच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करताना बचत, विमा, आपत्कालीन निधी आणि योग्य नामनिर्देशन (Nomination) यांचा विचार करणे गरजेचे आहे. आज केलेले योग्य नियोजन उद्याच्या अनिश्चित परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक आधार देऊ शकते.
 
 
६. कात्यायनी – योग्य निर्णयक्षमता
 
 
कात्यायनी देवीचे रूप शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे. आर्थिक व्यवहारांमध्येही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक आहे. कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक योजना निवडण्यापूर्वी तिच्या अटी समजून घेणे, अधिकृत माहिती तपासणे आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे ही शहाणपणाची बाब आहे.
 
 
७. कालरात्री – आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याची प्रेरणा
 
 
कालरात्री देवीचे रूप संकटांशी निर्भयपणे सामना करण्याची प्रेरणा देते. आजच्या काळात सायबर फसवणूक हे मोठे आव्हान आहे. ‘डिजिटल अरेस्ट’, बनावट KYC अपडेट, बनावट ग्राहक सेवा क्रमांक, फिशिंग लिंक आणि बनावट गुंतवणूक योजनांपासून सावध राहणे आवश्यक आहे. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधणे आणि सायबर फसवणुकीच्या प्रसंगी १९३० या हेल्पलाइनवर संपर्क करणे महत्त्वाचे आहे.
 
 
८. महागौरी – पारदर्शक आणि शिस्तबद्ध आर्थिक जीवन
 
 
महागौरीचे रूप शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. आर्थिक जीवनातही पारदर्शक व्यवहार, नियमित खाते तपासणी, व्यवहारांचे संदेश आणि स्टेटमेंट तपासणे यामुळे आर्थिक शिस्त राखता येते. आपल्या आर्थिक व्यवहारांची जाणीव ठेवणे म्हणजेच आपल्या पैशांबाबत जबाबदार असणे.
 
 
९. सिद्धिदात्री – आर्थिक उद्दिष्टपूर्तीची प्रेरणा
 
 
नवरात्रीच्या अंतिम दिवशी सिद्धिदात्री देवीची आराधना केली जाते. हे रूप उद्दिष्टपूर्तीची प्रेरणा देते. घर, शिक्षण, व्यवसाय, निवृत्ती किंवा मुलांचे भविष्य अशा प्रत्येक आर्थिक उद्दिष्टासाठी नियोजन, नियमित बचत, योग्य गुंतवणूक आणि सुरक्षित बँकिंग या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
 
 
आर्थिक सक्षमीकरणाची नवी सुरुवात
 
 
नवरात्रोत्सवात आपण देवीच्या शक्तीची आराधना करतो. त्याचबरोबर त्या शक्तीतून मिळणारी शिस्त, संयम, सतर्कता, निर्णयक्षमता आणि समृद्धीची प्रेरणा आपल्या आर्थिक जीवनातही उतरवूया.
 
 
बचतीची सवय लावूया, योग्य ठिकाणी गुंतवणूक करूया आणि प्रत्येक डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे करूया. कारण आर्थिक सुरक्षितता ही केवळ पैशांची नाही, तर योग्य सवयी आणि सजग निर्णयांचीही शक्ती आहे.
 
 
या नवरात्रीत संकल्प करूया —
 
 
“शक्तीची उपासना करूया आणि आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाटचाल सुरू करूया!”
rajesh pande